सोमनाथ खताळ, बीड : लोकसभा निवडणूक मतमोजणी निकालानंतर सोशल मीडियावर वादावादी सुरू झाली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्याने दोन समाजांत, गटांत हाणामाऱ्या, दगडफेक अशा घटना घडत आहेत. याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शांतता ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर तर कारवाई होणारच आहे, शिवाय त्याखाली कमेंट्स करणारे आणि ग्रुप ॲडमिनवरही कडक कारवाई करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी जातीय राजकारण झाले. मतमोजणीनंतर याचे पडसाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमटले. त्यानंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेत आवाहन केले. त्यामुळे काही दिवस शांतता राहिली. परंतु आता पुन्हा एकदा मतमोजणीनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने तणाव निर्माण होत आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी नजर ठेवून वादग्रस्त पोस्ट हटवल्या, शिवाय कारवायाही केल्या आहेत. परंतु लोकांनी हार-जीत मान्य करून शांतता ठेवावी. वादग्रस्त पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. जर कोणी अशा प्रकारच्या पोस्ट करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशिगंधा खुळे, स्वाती लहाने यांच्यासह सर्व सायबर टीम उपस्थित होती.
५५० पोस्ट हटवल्या
सायबर पोलिसांना ६०० पेक्षा अधिक वादग्रस्त पाेस्ट आढळून आल्या. त्यातील ५५० पोस्ट हटविण्यात आल्या आहेत. तसेच ३५० लोकांवर आतापर्यंत कारवाई केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
१५ दिवसांत २८ गुन्हे
व्हाॅट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांवर वादग्रस्त पाेस्ट केल्याने पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. गुरुवारपर्यंत हा आकडा २८ वर पोहोचला होता. यातील २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुशिक्षित लोकांकडूनच वादग्रस्त पोस्ट
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे हे सर्वात जास्त सुशिक्षितच आहेत. यामध्ये पत्रकार, वकील, इंजिनिअर आदींचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी अफवा पसरवलेल्या वकिलाला न्यायालयाने दोन दिवसांची पाेलिस कोठडी दिली आहे.
दोन दिवसांपासून वातावरण खराब
मतमोजणी झाल्यापासून वातावरण दूषित झाले आहे. दोन समाजांत वाद होत आहेत. भावना दुखावणाऱ्या पोस्ट, अफवा पसरवून वाद घातले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही ठाकूर म्हणाले.
... तर पोलिसांवरही होणार कारवाई
सामान्य नागरिकांप्रमाणेच काही पोलिस अधिकारी, कर्मचारीही राजकीय नेत्यांचे स्टेटस ठेवत आहेत. तसेच वादग्रस्त मजकूर पोस्ट करत आहेत. यावरही ठाकूर यांनी सांगितले की जर असे निदर्शनास आले तर पोलिसांवरही कारवाई केली जाईल.