लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्याचा प्रमुख जलस्त्रोत असणा-या मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाईत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाच्या वतीने आठवडाभरापूर्वीच देण्यात आले. हे कार्यालय १५ जानेवारीपासून अंबाजोगाईत कार्यान्वित करा, असे आदेश असूनही स्थलांतराबाबत प्रशासन अजूनही सुस्तच आहे. उलट स्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटले असून अधिका-यांचीही लातूरकरांना पुष्टी मिळू लागली आहे. बीड जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन हे स्थलांतर तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे.
केज व अंबाजोगाई तालुक्यातील ज्या शेतक-यांच्या हजारो एक्कर शेतजमिनी मांजरा धरणाच्या निर्मितीसाठी अधिग्रहण झाल्या. त्याच शेतकºयांची मोठी उपेक्षा सातत्याने धरण प्रशासनाकडून होत आहे. शेतजमिनी बीड जिल्ह्यातील अन् धरणाचा फायदा लातूरला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. हा भाग प्रामुख्याने अंबाजोगाई व केज तालुक्यात येतो. मांजरा धरण धनेगाव येथे केज तालुक्यातच असल्याने अंबाजोगाई येथे धरणाचे उपविभागीय कार्यालय सोयीस्कर ठरते. मात्र, धरणाच्या निर्मितीपासून हे कार्यालय लातूरला ठेवण्यात आले आहे. याचा मोठा फटका या परिसरातील शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागतो. लातूर येथील या कार्यालयाचे स्थलांतर अंबाजोगाई येथे करण्यात यावे, ही मागणी गेल्या २० वर्षांपासून सातत्याने लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या माध्यमातून होत आहे. याचाच पाठपुरावा म्हणून जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी शेतकºयांच्या मागणीनुसार हे उपविभागीय कार्यालय लातूर येथून अंबाजोगाई येथे १५ जानेवारीपूर्वी स्थलांतरित करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच पत्र महाराष्ट्राच्या उपसचिवांनीही पाठविले आहे.
कार्यालयाचे स्थलांतर रोखण्यासाठी मात्र लातूर येथील राजकारणी एकवटले असून प्रशासनातील अधिका-यांचीही त्यांना पुष्टी आहे. लातूर येथून कारभार हाकणा-या अधिका-यांना थेट जनतेशी संपर्क येत नाही. हे कार्यालय अंबाजोगाईत स्थलांतरित झाल्यास अधिका-यांना अंबाजोगाईत रहावे लागेल. अंबाजोगाईत राहणे टाळण्यासाठी अधिकाºयांनी लातूरच्या राजकारण्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केल्याचे बोलले जात आहे.ती आॅर्डरच मिळाली नाहीकार्यालयाचे स्थलांतर अंबाजोगाईत व्हावे व ही प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी करण्यात यावी, असे शासनाचे अध्यादेश आहेत. मात्र, तशी आॅर्डरच अजून आपल्या कार्यालयाला प्राप्त झाली नाही, अशी प्रतिक्रिया मांजरा धरणाचे उपविभागीय अभियंता महेंद्र जोशी यांनी दिली. प्रशासनच सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
कार्यालयाचे स्थलांतर रोखल्यास आंदोलनमांजरा धरणाची निर्मिती ही केज व अंबाजोगाई तालुक्यातील शेतक-यांच्या शेतजमिनींमुळे झाली आहे. धरणग्रस्तांना किमान धरणाचे पाणी व त्यासाठीच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपविभागीय कार्यालय अंबाजोगाईत असणे अत्यंत गरजेचे आहे. या कार्यालयाचे स्थलांतर लातूर येथून अंबाजोगाई येथे व्हावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाच्या वतीने स्थलांतराची प्रक्रियाही सुरू झाली.प्रशासनाच्या वतीने हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी दिला.
पालकमंत्र्यांकडून अपेक्षापालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामुळे मांजरा धरणाचे उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर लातूर येथून अंबाजोगाईत व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, हे स्थलांतर रोखण्यासाठी लातूरचे राजकारणी एकवटल्यामुळे पालकमंत्री मुंडे यांनी स्थलांतर रोखण्याचा घाट उधळून लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.