पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : लॉकडाऊनमुळे मागील एक महिन्यापासून आडत बाजार बंद आहे. शेतकऱ्यांकडे शेतीमाल घरी असूनही विकता येत नाही. मागील १५-२० दिवसांपासून बँकाही पैसे देत नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस पडला की लगेच खरिपाची पेरणी होईल. यामुळे बी-बियाणे, खते घ्यायचे कसे? याची चिंता आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
बीड जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. मागील एक महिन्यांपासून वेळेअभावी येथील आडत व्यापार बंद आहे. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करता येत नाही. सध्या शेतकऱ्यांकडे तूर, उन्हाळा बाजरी, ज्वारी, गहू, आदी शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. वेळेअभावी येथील आडत व्यापाऱ्यांनी मोंढा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवस वेळ असल्याने व हवामान खात्याने वेळेवर पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी वर्ग बी-बियाणे, खते घेण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु, आडत व्यापार बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल न विकल्याने व बँकेतूनही शेतकऱ्यांना पैसे दिले जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गास सावकाराकडे पाहण्याची वेळ आली आहे.
---
व्यापाऱ्यांना वेळ वाढवून द्या
पहिला लाॅकडाऊन सुरू असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आडत व्यापाराला वेळ दिल्याने आडत व्यापार व कापसाच्या जिनिंगदेखील सर्व नियमांचे पालन करीत चालू ठेवण्यात आले होते. परंतु, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये आडत व्यापाऱ्यांना वेळ वाढवून न मिळाल्याने सर्व आडत व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती येथील बाजार समितीचे सचिव हरिभाऊ सवणे यांनी दिली.
-----
आम्ही तहसीलदारांकडे आडत व्यापारास वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांनी वेळ वाढवून न देता आहे त्याच वेळेत सर्व व्यवहार करण्यास सांगितले. केवळ तीन, चार तासांत या ठिकाणचे व्यवहार होऊ शकत नसल्याने व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही वरिष्ठांकडे आणखीन वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. यामुळे सोमवारपासून आडत व्यापारास वेळ वाढवून मिळण्याची अपेक्षा आहे.
- संभाजी शेजूळ, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव