माजलगाव : राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ठिकठिकाणी ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांच्या उपचारात अडथळा निर्माण होत आहे. अशा बिकट परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन काळात लोकसहभागातून माजलगावात रुग्णांच्या उपचारासाठी पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा निर्माण होत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या बातम्या धडकत आहेत. या परिस्थितीत तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार वैशाली पाटील यांनी यंत्रणेमार्फत माजलगाव तालुक्यातील विविध ठिकाणांवरून ऑक्सिजन सिलिंडर संकलित केले. यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, जय महेश साखर कारखाना, माजलगाव शहरासह दिंद्रुड, तालखेड येथील खाजगी दुकानदारांकडूनही ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले आणि ऑक्सिजनचा साठा उपलब्ध केला. मिळालेल्या या तातडीच्या मदतीने रुग्णांच्या उपचारकामी मोठा आधार मिळाला.
माजलगाव तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनसाठा उपलब्ध ठेवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. या कर्तव्यातून प्रशासन सतर्क आहे. त्यादृष्टीने जालना येथून ३६ सिलिंडरचा साठा प्रशासनाने आपल्या ताब्यात जमा केला आहे. येत्या काळात वाढत्या कोरोना रुग्णांच्या उपचारादरम्यान लागणारा ऑक्सिजनसाठा पुरेसा उपलब्ध आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे.
शासनाच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव