केज : सर्वत्र भाजपची सत्ता असताना केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे. खा.रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांनी गड कायम राखत केज नगरपंचायतवर एकहाती सत्ता मिळविली. नगराध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपनगराध्यक्षपदी सायराबेगम दलिल इनामदार यांची निवड झाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसने केज नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. आगामी अडीच वर्षांसाठी देखील काँगेसने आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. केजचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारणसाठी असल्याने काँग्रेस व भाजपत ही लढत झाली.
काँग्रेसकडून आदित्य पाटील तर भाजपकडून हारून इनामदार यांचे अर्ज दाखल होते. आदित्य पाटील यांना ९ तर हारून इनामदार यांना ६ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या मालती गुंड यांनी नगराध्यक्ष पदासाठी तटस्थ भूमिका घेत मतदान करणे टाळले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसने सायराबेगम दलिल इनामदार यांना उमेदवारी दिली. भाजपकडून तरिमम इनामदार तर राष्ट्रवादी कडून मालती गुंड यांनी आपला अर्ज दाखल केला होता. यावेळी काँग्रेसच्या सायराबेगम इनामदार यांना ९ मतदान झाले, भाजपच्या तरिमम इनामदार यांना ४ तर मालती गुंड यांना केवळ ३ मते पडली. काँग्रेसने दोन्ही पदे आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवले.शरद पवारांचा आदेश झुगारलाराष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस सोबत तडजोडीचे राजकारण करत आहेत. मात्र केजमध्ये शरद पवार यांची पक्षाची भूमिका मात्र स्वत:च्या राजकारणापायी पायदळी तुडवली असून काँग्रेसला मदत न करता काँग्रेस विरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या या भूमिकेकडे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या दोन नगसेवकांनी नगराध्यपदासाठी भाजपला मतदान केले होते व त्याच दोन नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीला मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेमकी काय? असाच प्रश्न पडला आहे.भाजप व काँग्रेसचे नगरसेवक फुटलेया निवडणुकीत काँग्रेसच्या अश्विनी गाढवे व मुक्ता मस्के यांनी भाजपचे हारून इनामदार यांना मतदान केले तर भाजपच्या रमेश आडसकर गटाचे रवि अंधारे आणि अर्चना हजारे यांनी काँग्रेसचे आदित्य पाटील यांना मतदान केले. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण चार नगरसेवक फुटल्याचे सिद्ध झाले. भाजपचे हारून इनामदार यांनी बहुमत जमा करूनही ऐनवेळी भाजपच्या एका गटाने त्यांना साथ न दिल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.