बीड : शहरातील शाहूनगर भागातील संत ज्ञानेश्वर स्कूल बंद झाल्याने या शाळेतील आरटीई प्रवेशित २७ विद्यार्थ्यांचे समायोजन शिक्षण संचालकांच्या मान्यतेने इतर शाळांमध्ये करण्यात आले.
बीड येथील शाहूनगर भागातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलने २०१३-१४ पासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियमांतर्गत प्रवेश दिले होते; परंतु २०२१-२२ पासून शाळा बंद करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला. त्यामुळे मागील वर्षी आरटीई अंतर्गत प्रविष्ट दुसरी ते सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३० विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे आरटीईअंतर्गत समायोजन बार्शी रोड सोमेश्वरनगर येथील याच व्यवस्थापन मंडळाच्या संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये करण्याची मागणी केली होती.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पालकांच्या मागणीनुसार या ३० विद्यार्थ्यांचे आरटीईअंतर्गत संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल, बार्शी रोड, सोमेश्वरनगर येथे समायोजन करून शासनाकडून मिळणारा शुल्क प्रतिपूर्ती परतावा या शाळेत वर्ग करणे किंवा अन्य इतर शाळांत प्रवेश देण्याबाबत मान्यतेसाठी जिल्हा परिषदेने शिक्षण संचालकांकडे विनंती केली होती. संबंधित बंद शाळेतील आरटीई प्रवेशित ३० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यास शिक्षण संचालकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर बीडचे गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव यांनी शहरातील आरटीईअंतर्गत असणाऱ्या शाळांतील वर्गनिहाय रिक्त पदांचा अहवाल शिक्षण विभागाला पाठविल्यानंतर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर समायोजन प्रस्ताव सादर करण्यात आला.
असे झाले समायोजन
एकूण विद्यार्थिसंख्या - ३०
पालकांच्या विनंतीनुसार समायोजन करावयाचे प्रस्ताव - २७
आरटीईअंतर्गत प्रवेशास नकार दिलेले विद्यार्थी - ०३
उपलब्ध जागेनुसार समायोजन करावयाचे विद्यार्थी - ५
पालकांच्या मागणीनुसार रिक्त जागेवर समायोजन विद्यार्थिसंख्या - २१
वर्ग दुसरीचे समायोजन करावयाचे विद्यार्थी - ०१
-------------
प्रत्येकाचे शिक्षण महत्त्वाचे
वर्ग दुसरीच्या रिक्त जागा तीन व समायोजन करावयाचे विद्यार्थी चार असल्याने पालकांच्या मागणीनुसार आरटीईच्या शाळेमध्ये अतिरिक्त समायोजन करण्यात आलेले आहे. अशा एकूण २७ विद्यार्थ्यांचे आरटीईअंतर्गत इतर शाळांत उपलब्ध रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले आहे. या समायोजित विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एनआयसीमार्फत प्रवेशित करून आरटीई शुल्क प्रतिपूर्ती नियमाप्रमाणे त्या-त्या शाळांना वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेने कळविले आहे.
---------
महाराष्ट्रात प्रथमच
बंद झालेल्या इंग्रजी शाळेतील आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचे शहरातील गुरुकुल, चंपावती, ट्विंकल स्टार, भगवान, जिनियस , शांतिनिकेतन, सेन्स, अश्वलिंग या शाळांत समायोजन करण्यात आले. वास्तविक पाहता अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद नव्हती. त्यामुळे विशेष बाब म्हणून शिक्षण संचालकांकडे सीईओ अजित कुंभार, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी पाठपुरावा केला. महाराष्ट्रात प्रथमच असा निर्णय घ्यावा लागला. शासन व प्रशासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे २७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
-------------
-----------