बीड : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळातदेखील आदेशाचे उल्लंघन करून बीड शहरातील मोंढ्यात काही व्यापारी छुप्या पद्धतीने व्यापार करत होते. याची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस व महसूलच्या पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ दुकानांवर कारवाई करीत ती सील केली आहेत.
बीडमधील मोंढा भागातील काही व्यापारी पहाटेच्या दरम्यान दुकानातून मालाची विक्री करत होते. याची माहिती मिळताच बीडचे तहसीलदार शिरीष वमने आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून नऊ दुकाने सील केली. जिल्हाधिकारी यांच्या निर्बंधांचे सर्वांनी पालन करावे, जेणेकरून रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन तहसीलदार शिरीष वमने यांनी केले आहे, तर याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.