आष्टी : आष्टी तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी आष्टी प्रशासन सज्ज झाले आहे. ३३ मतदान केंद्रावर १४८ कर्मचारी अधिकारी, व ३३ पोलिस कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली आहे.
या निवडणुकीतमध्ये १५ जानेवारी रोजी १२ हजार ३२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आष्टी तालुक्यातील मुदत संपलेल्या १२ ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून शेरी बुद्रुक ग्रामपंचायत एकमेव बिनविरोध झाली आहे. ११ ग्रामपंचायतच्या ७५ जागेसाठी १६२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण ३३ मतदान केंद्रावर १२ हजार ३२८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ६ हजार ६५८ पुरुष, ५ हजार ६७० महिलांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ४ अधिकारी कर्मचारी व एक पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकुण १४८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दि.१४ रोजी मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाऱ्यांना रवाना केले आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी ५ बस, ३ जीप ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान शांततेने होण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, सर्व तयारीनिशी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली. यावेळी नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर उपस्थित होते.