बीड : कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून संपर्क क्रमांक दिला. या कक्षातून मदत होईल, असा बोभाटा प्रशासनाने केला. परंतु प्रत्यक्षात येथून कसलीच मदत होत नाही. केवळ अन्न निरीक्षकाचा संपर्क क्रमांक देण्याचे काम येथून केले जात आहे. निरीक्षक फोन घेत नसल्याने समस्या कायम असून नातेवाईक आजही धावपळ करताना दिसत आहे. प्रशासनाकडून केवळ कागदी घाेडे नाचवून सामान्यांशी खेळ खेळण्याचा प्रकार केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खाटा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यातच औषधी पुरवठाही वेळेवर होत नसल्याने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश झाला आहे. तसेच कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा जास्त प्रभाव होत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. एका इंजेक्शनसाठी नातेवाइकांची धावपळ होत आहे. ही धावपळ थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार करण्यात आला. येथून संपर्क क्रमांक प्रसिद्धीसाठी देण्यात आला. परंतु, येथून काहीच मदत होत नाही. केवळ औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांचा संपर्क क्रमांक दिला जात आहे. डोईफोडे यांच्याकडूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन उपाययोजना केल्याचा नुसताच बोभाटा करत आहे. प्रत्यक्षात त्याचा सामान्यांना काहीच फायदा होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा ठरावीक मेडिकलमधून केला जात आहे. यावर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे हे स्वत: संबंधित मेडिकलवर बसून शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा दुपटीने शुल्क आकारून इंजेक्शन विकत आहेत, अशी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.
डोईफोडे फोन घेत नाहीत, नातेवाईक संतापले
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची जबाबदारी औषध प्रशासनाची आहे. औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्यावर सर्वांना ते मिळवून देण्याची जबाबदारी आहे. परंतु ते कोणाचाच कॉल घेत नाहीत. त्यामुळे रुग्ण तडफडत असून नातेवाइकांची धावपळ होत आहे. त्यांची बाजू घेण्यासाठी शुक्रवारीदेखील त्यांना संपर्क करण्यात आला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही.