बीड : उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावू शकतो व ते आपल्या परिसराचा विकास करु शकतात, असे मत प्रा. सुधीर माने यांनी व्यक्त केले.
कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे उन्नत भारत अभियाना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. माने बोलत होते.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपंगे हे उपस्थित होते.
प्रा. माने म्हणाले की, उन्नत भारत अभियान हे एक महत्त्वाचे अभियान असून त्यातून ग्रामीण लोकांच्या जीवनातील अनेक समस्याचे निराकारक होऊ शकते.
प्रास्ताविक उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. त्यांनी या अभियानाचे महत्त्व विस्तारपूर्वक विशद केले. डॉ. विजय भटकर, आयटीआय, एनआयटी, एमएचआरडीसी दिल्ली, तांत्रिक, कृषि आणि सर्व अकृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे अभियान चालवले जाते.
चौसाळा परिसरातील पाच गावे दत्तक घेण्यात आली असून त्यांचा सर्व्हे करुन त्यांचा विकास कसा करता येईल याचेही काम या अभियानातून केले जाणार आहे, असे डॉ. लांडगे यांनी विशद केले. एकूणच उन्नत भारत अभियानाच्या संदर्भात अनेक बाबींचा उहापोह या कार्यशाळेत झाला.
आभार प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी केले तर पाहूण्यांची ओळख प्रा.डॉ. सुधाकर वनवे यांनी केले. या प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.