अविनाश कदम
आष्टी : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने तालुक्यात खरिपाची पुरती दैना झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे ३९ हजार हेक्टरला दणका बसला आहे. १० दिवसांच्या विश्रांतीनंतर २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी व शनिवारी तालुक्यात रात्रभर सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेतातील कांदा, तूर, कापूस पिके अतिरिक्त पाणी साठल्याने सडू लागली आहेत.
शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या उडदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातून सावरत नाही तोच ढगाळ वातावरण व पावसाने लागवड व पेरणी केलेल्या क्षेत्रातील कांदा सडू लागला आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परिसरात जोरदार पावसाने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी साचले. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री १० वाजेपासून रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्या तर रविवारची सकाळ दाट धुके घेऊन आली. पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
....
ढगाळ वातावरणामुळे कांदा, तूर, कापूस पिकावर वेळेत फवारणी करावी
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेतकऱ्यांनी योग्य त्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. तूर, कापूस या पिकांवर रसशोषण व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे योग्य त्या औषधांची सूक्ष्म मूलद्रव्यासहित वेळेत फवारणी करावी.
- गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी
260921\img-20210926-wa0280_14.jpg