सोमनाथ खताळ, बीड : केज तालुक्यात रात्रीच्या वेळी हायवेवर जॅक टाकून ट्रक थांबवायचा. जॅक उचलण्यासाठी चालक खाली उतरताच त्याला मारहाण करीत लुटायचे. ही टोळी वर्षभरापासून सक्रिय झाली होती. यातील नऊ जणांना बीड पोलिसांनी अगोदरच बेड्या ठोकल्या होत्या. परंतु यातील एक दरोडेखोर वर्षभरापासून फरार होता. सोमवारी गटारी अमावस्येसाठी पुण्याहून गावी नांदूरघाट येथे येताच मंगळवारी पहाटेच्या सुमारास तो झोपेतून उठण्याआधीच त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
विक्रम आप्पा शिंदे (वय २७, रा. नांदूरघाट, ता. केज) असे कुख्यात दरोडेखोराचे नाव आहे. विक्रमसोबतच केज व कळंब तालुक्यातील इतर नऊ साथीदार होते. ही टोळी मिळून दराेडा, घरफोड्या, लुटमारीसारखे गुन्हे करत होते. मागील वर्षी याच टोळीने नवी शक्कल लढवली. हायवेवर जॅक टाकून ट्रक चालकाला आमिष दाखवायचे. हा जॅक उचलण्यासाठी चालक खाली उतरताच ही टोळी त्यांच्यावर हल्ला करून सर्व पैसे व इतर मुद्देमाल घेऊन पसार व्हायचे. एकवेळी तर याच टोळीने कंटेनरच पळविला होता.
याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. परंतु केज ठाण्यातील एका गुन्ह्यात या टोळीतील सर्व दराेडेखोर पकडले होते. परंतु विक्रम हा वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देत होता. तो आपल्या कुटुंबासह पुण्याला राहायला गेला होता. सोमवारी गटारी अमावस्या असल्याने घरी वस्तीवर कार्यक्रम होता. त्यासाठी तो कुटुंबासह गावी आला. रात्री पोटभर जेवण केल्यानंतर तो घरातच झोपला. हीच माहिती एलसीबीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी पहाटे तीन वाजताच वस्तीच्या भोवती सापळा लावला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास उजेड पडल्यावर विक्रम झोपेतून उठण्याआधीच त्याला बेड्या ठाेकल्या. त्याला केज पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोउपनि सुशांत सुतळे, हवालदार रामदास तांदळे, बालकृष्ण जायभाये, मारुती कांबळे, राजू पठाण, भागवत शेलार, अर्जुन यादव, अतुल हराळे आदींनी केली.