बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर साखर कारखान्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सजग झाले आहेत. गाळप हंगाम सुरू होण्याआधीच ज्यूस टॅँक व इतर यंत्रणेची पाहणी, तपासणी करण्यात येते, अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली. दूध पोळल्यानंतर ताकही फुंकून पिणे यातच खरा शहाणपणा ठरत असल्याने कामगारांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखान्यांना पुन्हा नव्याने दक्षता घेण्यासाठी ठोस उपाययोजना आखाव्या लागणार आहेत.
माजलगावात हंगामाआधीच होते तपासणी, दुरुस्तीवैद्यनाथ कारखान्यात मागील आठवड्यात झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याने ज्यूस टँक देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला असून माजलगाव तालुक्यातील सुंदरराव सोळंके, छत्रपती आणि जय महेश या साखर कारखान्यांकडून हंगाम सुरु होण्याआधीच ज्यूस टँक व इतर मशिनरीची देखभाल दुरुस्तीबाबत काळजी घेतली जाते, अशी माहिती देण्यात आली.वारंवार टँकचे तापमान संतुलित करणे, टँक देखभाल दुरुस्तीबाबत अभियंत्यांना कायम सतर्क राहण्याचे आदेश कारखाना प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे अशा दुर्घटनांना निश्चितच आळा बसणार आहे. याबाबत लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.डी.घोरपडे, छत्रपती कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.एस.शिंदे आणि जय महेश शुगर्सचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे म्हणाले की,ज्युस टँक सेफ्टीसाठी हंगामापुर्वीच देखभाल व नियमित कर्मचाºयांमार्फत तपासणी सुरु असते. प्रेशर जास्त झाल्यास ते बाहेर सोडण्याची व्यवस्था केली जाते, अशी माहिती देण्यात आली. सोळंके कारखान्यात २ लाख ३५ हजार, जय महेशमध्ये ३ लाख ७५ हजार, तर छत्रपती कारखान्यात ९८ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे.
गेवराईत तिन्ही शिफ्टमध्ये घेतात खबरदारीगेवराई तालुक्यातील गढी येथील जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाणीवरील क्रेन, मिल बॉयलर, बॉयलींग हाउस डोअर व पॅन विभाग शुगर हाऊस येथे कारखान्यातील प्रत्येक पाळीमध्ये कारखान्याचे अधिकारी, चीफ केमिस्ट चिफ इंजिनिअर, असिस्टंट इंजिनिअर जनरल मॅनेजर, कार्यकारी संचालक प्रत्येक दिवशी दररोज प्रत्यक्ष वेळोवेळी मशिनरीची तपासणी करून घेत आहेत. कोणतीही अनुसुचित प्रकार घड़ू नये म्हणुन प्रत्येक शिफ्टमधील अधिकारी सर्व पातळीवर खबरदारी घेत असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. २२ डिसेंबर रोजी रोजी कारखान्यात ९० हजार ७२२ मेट्रिक टन गाळप होऊन ६७ हजार २७५ पोते साखर उत्पादन करण्यात आली असून उतारा ७.८० इतका आहे.
अंबाजोगाईत अंबासाखरचे स्वतंत्र दक्षता पथकअंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथक स्थापन केले आहे. जिल्ह्यातील पहिला व सर्वात जुना कारखाना आहे. आजतागायत दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय आखले आहेत. ‘वैद्यनाथ’ मधील दुर्घटना घडल्यानंतर सर्व संचालक व कामगारांची बैठक घेऊन उपाय योजना आखल्या. एक अभियंता व सोबत तंत्रज्ञ असे स्वतंत्र पथक रोज मशिनरीचा आढावा घेते. आवश्यक तेथे तात्काळ दुरूस्ती होते. यामुळे कारखान्याची मशीनरीही सुस्थितीत सुरू झाली आहे. अंबासाखरची गाळप क्षमता अडीच हजार मेट्रीक टन असून आजतागायत ५० हजार मेट्रीक टन गाळप झाले आहे.
केजमध्ये बॉयलर, बर्निंग हाऊसची आठवड्याला तपासणीकेज तालुक्यात दोन साखर कारखाने असून, यापैकी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे तर येडेश्वरी साखर कारखान्याच्या वतीने गाळप बंद कालावधीत हैड्रोलिक तपासणी करून घेतली जाते. बॉयलर, बर्निंग हाऊसची आठवड्यातून एक दिवस तपासणी करुन कामगार आणि कर्मचाºयांंच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय केले जात असल्याची माहिती येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, व्हॉईस चेअरमन कल्याण शिनगारे आणि मुख्य अभियंता दत्तात्रय पतंगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.बॉयलर आॅफिस बांद्रा मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या प्रमुख ठिकाणी अग्नीशमन व्यवस्था आहे. कारखान्याच्या बंद काळात हैड्रोलिक चाचण्या होतात. बर्निंग हाऊसमध्ये त्रयस्थांकडून प्रेशरची नियमित तपासणी होते. उंचीवर काम करणाºया कर्मचाºयांना हेल्मेट, गॉगल आणि सुरक्षित बेल्टचा वापर बंधनकारक केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने काम योग्य रितीने झाले काय ? याची क्रॉसचेकिंगही नियमित होते. चुका आढळल्यास साप्ताहिक बैठकीत कर्मचाºयांना सूचना दिल्या जातात. २० डिसेंबरपर्यंत कारखान्याने १ लाख ५३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप चालू हंगामात केले आहे. सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचा कारखाना प्रशासनाचा दावा आहे.
परळीत ‘वैद्यनाथ’मध्ये ज्यूस टॅँकच्या तपासणीनंतर दुरुस्तीपरळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात ऊसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा बळी गेला तर ५ जखमी झाले. या घटनेनंतर कारखान्यातील सुरक्षीततेची काळजी मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून सुरक्षा यंत्रणाही पुर्वीपेक्षा अधिक आता सतर्क झाली आहे. फायर फायटींग, ड्राय पावडर, कार्बनडाय आॅक्साईडचे सिलेंडर, सेफ्टी गण वाढविले आहेत. दर ८ तासाला दोन वेळा कारखाना परिसरात सुरक्षा विभागाचे कर्मचारी राउंड घेत आहेत. ऊसाच्या गरम रसाची जी टाकी फुटली त्या टाकीची तपासणी करून दुरूस्ती केली जाणार आहे. तसेच इतर टाक्या उपयोगात आणून ऊस गाळपाची प्रक्रिया सुरू केली आहे. चालू गळीत हंगामात २१ डिसेंबरपर्यंत १ लाख ४४ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर शाहूराव येवले यांनी दिली.