बीड : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आणि संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या एकमेव प्रयोगशाळेवर पडणारा ताण यातून मार्ग काढत राज्य शासनाने अखेर बीड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी व्हीआरडीएस प्रयोगशाळा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे.
जिल्ह्यात दररोज जवळपास ४००० आरटीपीसीआरच्या चाचण्या होत आहेत. त्यांचा वेग आणखी वाढविण्याबाबत यापूर्वीच सूचना केलेल्या आहेत. मात्र जिल्ह्यात अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात एकमेव प्रयोगशाळा असल्याने ताण येत होता. त्यामुळे संशयितांचे अहवाल येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो आहे. याच अनुषंगाने बीडमध्येच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याप्रमाणे याला मंगळवारी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
दरम्यान व्हीआरडीएल प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली पद भरती, आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेत आवश्यक असलेली उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्य साधन सामुग्रीची खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. यासाठी १ कोटी ८३ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यासाठी आवश्यक ते तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळ यासाठीचा खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत उपलब्ध निधीतून करावा. तसेच प्रयोगशाळा उपकरणे, साहित्य खरेदीसाठी लागणारा खर्च हा राज्य आपत्ती व्यवस्थापन निवारण निधी, जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून करावा, असेही आदेशात म्हटलेले आहे.