बीड : राज्यभर गाजलेल्या बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच परळीजवळील शेतात मुलीच्या नावे पुन्हा गर्भपाताचे दुकान थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल ६० जणांच्या पथकाने शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत त्याच्या रुग्णालयातून गर्भपातासाठी आवश्यक उपकरणे, औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून मुंडे याला अटक करण्यात आली आहे.
गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात न्यायालयाने मुंडे दाम्पत्यासह त्या महिलेच्या पतीला १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सहा महिन्यांपूर्वी सुदाम मुंडेला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील न्यायालयाने रद्द केले आहे. बाहेर येताच परळी येथील नंदागौळ रोड वरील रामनगर वस्तीजवळ शेतात मुलीच्या नावाने असलेल्या दोन मजली दवाखान्यात त्याने प्रॅक्टिस सुरू केली होती.
शनिवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे परळीत होते. त्यांच्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री १० वाजता पथकाने या शेतात छापा टाकला. पहाटे ६ वाजेर्यंत कारवाई सुरु होती. पहाटे त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुपारी अटक करण्यात आली.
फौजदारी गुन्हा दाखल
डॉ. सुदाम मुंडेविरुद्ध इंडियन मेडीकल काउन्सिल अॅक्ट १९५६ चे १५(२), महाराष्टÑ मेडीकल प्रॅक्टीशनर अॅक्ट १९६१ चे कलम ३३(२), आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(बी), वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ३, ४, ५ मुंबई सुश्रुषा नोंदणी कायदा १९४९ कलम ३ (२) आदींप्रमाणे गुन्हा नोंदविला.
दवाखान्यातील साहित्य सील
डॉ. सुदाम मुंडे याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात औषधसाठा, पोर्टेबल एक्स-रे मशीन, गर्भपातासाठी आवश्यक असणारी उपकरणे, नेबुलाईझर व आॅक्सिजनच्या प्रत्येकी दोन मशीन आढळून आल्या. पथकाने हे सर्व साहित्य सील केले. तसेच यावेळी चार रु ग्ण उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे दिसून आले. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासदृश रु ग्णांवरही त्याने उपचार सुरू केले होते.