बीड : तुळजापुरहून येताना कुंथलगिरी येथून पेढा आणला. तोच खाल्ल्याने लहान मुलांसह मोठ्या १५ माणसांना उलटी, मळमळचा त्रास सुरू झाला. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व रुग्ण बीड तालुक्यातील आहेर वडगावचे आहेत.
तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आहेर वडगाव येथील भाविक गेले होते. परत येताना या भाविकांनी धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी येथून पेढा आणला. हाच पेढा गावात आल्यावर प्रसाद म्हणून सर्वांना दिला. लहान मुलांसह मोठ्या व्यतींनीही तो चवीने खाल्ला. पण शनिवारी दुपारनंतर या सर्वांना उलटी, मळमळ, जुलाबासारखा त्रास सुरू झाला. दुपारी साडेतीन वाजता दोन मुलांना दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत १५ जण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. या सर्वांवर डॉ. रविकांत चौधरी, डॉ. राजश्री शिंदे, डॉ. शंकर काशीद, डॉ. अनंत मुळे यांच्यासह परिचारिका, ब्रदर, कक्षसेवकांनी उपचार केले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना वॉर्डमध्ये पाठविल्याचे डॉक्टरांनी सांगितले.