बीड - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका. कारण, निवडणुकांपूर्वी ते धर्मनिरपेक्ष असतात. पण, निवडणुका झाल्यानंतर ते धर्मनिरपेक्ष नसतात. कदाचित, निवडणुका झाल्यानंतर ते भाजपला पाठिंबा देतील, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवांरांनी राज्यातील निवडणूक निकालांवेळी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.
देशाची अर्थव्यवस्था बिघडवली, देशात बेरोजगारी वाढली, तरीही लोकं म्हणतात याला पर्याय नाही. पण, मोदीला बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधातील पक्षाला आपण निवडूण दिलं पाहिजे. माझ्या मुस्लीम बांधवांनो राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणुकांपूर्वी धर्मनिरपेक्ष पार्टी असते. तर, निवडणुकांनंतर सेक्युलर पक्षांसोबत आपली तडजोड करतात. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बनलं नसतं, जर राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा जाहीर केला नसता. निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला प्रश्न विचारा की, का तुम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. जर, तुम्ही चुकून माखून राष्ट्रवादीला मतदान केलं, तर निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपावासी होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी बीडमधील उमेदवाराच्या सभेवेळी बोलताना म्हटले. एकीकडे आड तर दुसरीकडे विहिर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण तिसरा पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला स्विकारले पाहिजे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांविरुद्धची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला तर झाला, असेही राज यांनी म्हटले. मात्र, निवडणुकांनंतर राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला तर मनसेच्या भूमिकेचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा रोखही राज यांच्याच दिशेने होता की काय, अशी चर्चा रंगत आहे.