गेवराई (बीड ) : परभणी येथील एक कुटुंब लग्नासाठी अहमदनगरकडे जात असतांना त्यांच्या कारला कोळगावजवळ जीपने समोरासमोर धडक दिली. याचवेळी एक दुचाकी कारवर धडकली. दरम्यान, रस्त्याच्या खाली गेलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने यात होरपळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास घडली. तर यात गंभीर भाजलेल्या मुलीचेही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती असून एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर जाधव (40 ) हे पत्नी मनिषा व मुलगी लावण्या सोबत परभणी येथून नगरकडे एका लग्नासाठी आज सकाळी कारने ( एम.एच.14 एफ.एम 8639 ) जात होते. दुपारी १२.३० च्या दरम्यान कोळगावजवळ त्यांच्या कारला एका जीपने ( क्रमांक एम.एच.16 बी.डी 2151 ) समोरून धडक दिली. तसेच समोरून आलेल्या एका दुचाकीनेसुद्धा (एम.एच.23 ए.क्यु 4596) कारला जोरदार धडक दिली.
यातच जोरदार धडकेने रस्त्याच्या खाली गेलेल्या कारने अचानक पेट घेतला. आगीने चारीबाजूने वेढलेल्या कारमधून ज्ञानेश्वर आणि लावण्या हे कसेबसे बाहेर पडले. मात्र, मनिषा यांना कारमधून बाहेर पडता आले नाही. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि मनीषा यांचे बाहेर पडण्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. आग भीषण असल्याने त्यांना वाचविण्यास अडथळा आला, यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी गंभीररीत्या भाजलेल्या ज्ञानेश्वर आणि लावण्या यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. मात्र, उपचार सुरु असताना लावण्या हिचा मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर हे ६३ टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.