बीड : पायाला जखम झाली. त्यामुळे उपचारासाठी रूग्णालयात गेला. दोन चार दिवस सलग गेल्यानंतर तेथील डॉक्टर मुलीचा मोबाईल नंबर घेतला. तिला मोबाईलवर 'आय लव्ह यू' असे मेसेज पाठवू लागला. मागील दोन वर्षांपासून या मुलीला हा त्रास सुरू होता. अखेर तो असह्य झाल्याने तिने पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून बीड शहर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी एका बारमध्ये दारू ढोसत असतानाच आरोपीला बेड्या ठोकल्या.
सतीश बबनराव क्षीरसागर (रा.लक्ष्मणनगर, बार्शी रोड, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटात वाद झाले होते. याच भांडणात सतिशच्या पायाला जखम झाली होती. तो उपचारासाठी बार्शी रोडवरील एका रूग्णालयात गेला. जखम मोठी असल्याने नियमित रूग्णालयात जाणे-येणे होत असे. याच ठिकाणी काम करणाऱ्या एका डॉक्टर मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम जडले. त्याने उपचाराच्या बहाण्याने तरूणीचा मोबाईल क्रमांक मिळवला. सुरूवातीला तिला मेसेज केले. नंतर कॉल करून त्रास देऊ लागला. परंतू मुलीने बदनामीपोटी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. परंतू मागील आठवड्यापासून दारूच्या नशेत सतीश हा डॉक्टर मुलीला जास्तच त्रास देऊ लागला. घराबाहेर पडल्यावर तिला रस्त्यात अडवत असे. हा त्रास असह्य झाल्यानेच मुलीने हा प्रकार आपल्या कुटूंबातील सदस्यांना सांगितला. त्यांनी बीड शहर ठाणे गाठत सतीश विरोधात फिर्याद दिली. त्याप्रमाणे ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. सतीश हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरीलच एका बारमध्ये दारू ढोसत बसला होता. याच ठिकाणी जावून सुंदर चव्हाण, बाळासाहेब शिरसाट, सय्यद अशपाक या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली.