बीड / सिरसाळा : शेतातील आखाड्यावर झोपलेल्या सालगड्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून आत्महत्येचा बनाव केला. मात्र झोपलेल्या ठिकाणी सांडलेल्या रक्तामुळे या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथे घडली.सुदाम नामदेव देवकते (६० रा.कौडगाव घोडा, ता. परळी) असे मयताचे नाव आहे. सुदाम हे गावातीलच माणिक भगवान कोळेकर यांच्याकडे वर्षभरपासून सालगडी म्हणून कामावर होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या सुमारास दोघेही शेतातील आखाड्यावर झोपण्यासाठी जात होते. २ मार्च रोजीही सुदाम व माणिक सोबतच गेले होते. मात्र एकादशी असल्याने माणिक हा बाजूच्या वस्तीवर भजन ऐकण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्याला येण्यास उशीर झाला.रात्रीच्या सुमारास परत आल्यावर त्याला सुदाम झोपलेल्या ठिकाणी दिसले नाहीत. तसेच बैलही मोकळे दिसले. झोपलेल्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसले. माणिकने तेथून पळ काढत वस्ती गाठली आणि घडला प्रकार सर्वांना सांगितला. त्यानंतर नागरिकांनी धाव घेत सुदाम यांचा शोध घेतला.बाजूलाच असणाऱ्या एका विहिरीच्या कडेला सुदाम यांचे बूट दिसून आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत दिसला. नागरिकांनी ही माहिती सिरसाळा पोलिसांना दिली.अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, डॉ.अर्जुन भोसले, सिरसाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलीस उप निरीक्षक जनक पुरी, चाँद मेंढके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाजूला काढून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर माणिक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार जनक पुरी हे करीत आहेत.आत्महत्येचा केला बनावसुदाम यांचा खून करून प्रेत विहिरीत टाकले. यामुळे त्यांनी आत्महत्या केले, असे भासविले. मात्र झोपलेल्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि कपाळावरील तीक्ष्ण हत्याराच्या वारामुळे हा खून असल्याचा संशय बळावला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. लवरकच याचा तपास पूर्ण करू असे तपास अधिकारी जनक पुरी यांनी सांगितले.
सालगड्याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:32 PM
शेतातील आखाड्यावर झोपलेल्या सालगड्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून आत्महत्येचा बनाव केला.
ठळक मुद्देकौडगाव घोडा येथील घटना : सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल