बीड :बीड शहरात फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गल्लीपासून ते महामार्गापर्यंत विनापरवाना बॅनर व होर्डिंग्ज असल्यामुळे बीड शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास होतो. वाहतूकीसह अडथळा निर्माण होत आहे. पालिका व पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचे ‘लोकमत’ने ११ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून समोर आणले होते.
याची गंभीर दखल घेत मंगळवारी सकाळपासूनच अनाधिकृत बॅनर व होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई हाती घेण्यात आली. मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छत निरीक्षक आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, भागवत जाधव, महादेव गायकवाड, ज्योती ढाका, रमेश डहाळे आदींनी ही कारवाई केली.