बीड : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक कॅरीबॅग विकण्यास सक्त बंदी आहे. मात्र तरीही बीड शहरात सर्वत्र प्लास्टीचा वापर होत होता. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने सोमवारी ‘प्लास्टीकबंदी कागदावरच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर बीड पालिका खडबडून जागी झाली आणि कामाला लागली. अवघ्या सहा तासांत तब्बल ३० हजार रूपयांचा दंड वसुल केला.
बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने शहरात प्लास्टीक बंदी करण्यात आली होती. सुरूवातीला काही दिवस चांगल्या कारवाया झाल्या. प्लास्टीकही जप्त केली. मात्र नंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हाच धागा पकडून सोमवारी ‘प्लास्टीकबंदी कागदावरच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि सकाळी सात वाजेपासूनच कारवाईची मोहीम हाती घेतली.
स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके यांच्यासह पथक सुरूवातील साठे चौकात धडकले. हातगाड्यांपासून ते मोठ्या दुकानांना अचानक भेटी देऊन प्लास्टीक जप्त केली. तसेच सहा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आकारून तब्बल ३० हजार रूपये वसुल केले. या कारवाईमुळे पुन्हा एकदा प्लास्टीक वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, पथक प्रमुख एम.एम.भंडारी, मुन्ना गायकवाड, लखन प्रधान, पवन लाहोट, राजु वंजारे, सचिन जगताप, सुरेंद्रसिंह परदेशी आदींनी केली.
२२ एप्रिलला शेवटची कारवाईबीड पालिकेने प्लास्टीक जप्तीसंदर्भात नियुक्त केलेल्या विशेष पथकाने २२ एप्रिल रोजी शेवटची कारवाई केली होती. त्यानंतर सोमवारी हे पथक सकाळपासूनच कामाला लागले. यापुढेही दुकानांची तपासणी, प्लास्टीक जप्ती आणि दंड वसुलीची मोहीम सुरूच राहील, असे पथकाकडून सांगण्यात आले.