माजलगांव (बीड ) : अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. मात्र, या प्रकरणाला आता महिना पूर्ण होईल तरीही अद्याप एकाही संचालकाला पोलिसांनी अटक केली नाही.
शहरातील परिवर्तन मल्टीस्टेट, सामाजिक परिवर्तन पतसंस्थेचा अध्यक्ष विजय अलझेंडे याच्यासह संचालक मंडळाने ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यावधीच्या ठेवी गोळा केल्या. प्राथमिक माहितीनुसार शेकडो ठेवीदारांनी अठरा ते वीस टक्के व्याजाच्या आमिषाने जवळपास २५ ते ३० कोटी रुपयाच्या ठेवी ठेवल्या. यानंतर या ठेवी परत देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केली. यामुळे शेकडो ठेवीदारांनी पतसंस्था अध्यक्ष विजय अलझेंडेसह संचालक मंडळ अशा ३६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड यांच्याकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत ८० ठेवीदारांनी पोलिसात धाव घेतली आहे.
पोलिसांचा अजून तपासच सुरु दरम्यान, गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी उलटत आहे. तरीही पोलीस अजूनही तपासच करत असून त्यांनी अद्याप कोणत्याही आरोपीळा अटक केले नाही. यामुळे यातील आरोपी उजळ माथ्याने शहरात वावरताना दिसतात. तसेच सोमवारी न्यायालयाने यातील पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले असल्याने त्यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ठेवीदारांमधून होत आहे.
फसवणुकीचा आकडा ७ कोटींवर पोलिसात दाखल तक्रारीत ठेवीदारांनी ठेवीच्या पावत्या जमा केल्या आहेत. यावरून हे प्रकरण ७ कोटी रुपयाच्या फसवणुकीचे आहे असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार काही लोकांनी आयकरचा ससेमिरा मागेलागु नये म्हणून ठेवीचा आकडा कमी सांगितल्याचे बोले जात आहे. यानुसार फसवणुकीचा खरा आकडा जवळपास ३० कोटीच्या घरात जातो.
लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ या प्रकरणी तपास सुरु आहे. आम्ही सर्व कागदपत्रे बारकाईने तपासत आहोत. यामुळे आरोपींना अटक करण्यास उशिर होत आहे. लवकरच तपासाचे काम पूर्ण करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येईल. - मारुती शेळके, सहाययक पोलीस निरीक्षक,आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा