अंबाजोगाई,दि. २६ : ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे जवळपास सव्वा चार लाखांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या तेलंगणा राज्यातील दोघांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. शफिक कलीम शेख आणि सय्यद रफिक अहमद (दोघेही रा. कोकरी क्रॉस, ता. कद्री, जिल्हा अनंतपूर, तेलंगणा राज्य) अशी या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहित अशी कि, अंबाजोगाई येथील वसंतराव बाबुराव हातागळे यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम त्यांनी तत्कालीन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद खात्यात ठेवली होती. दि. २१ सप्टेंबर २०१६ रोजी ते ४.३० वाजताच्या सुमारास अंबाजोगाईच्या मोंढा रोडवरील हैद्राबाद बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता सदरील दोन चोरटे त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. वसंतराव हातागळे एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांनी पासवर्ड पहिला. हातागळे यांनी दीड हजाराची रक्कम काढली असता या दोन्ही चोरट्यांनी मशीनमध्ये गडबड झाल्याचा कांगावा केला आणि गोंधळात हातागळे यांचे एटीएम कार्ड लंपास करून त्यांच्याकडे सारखेच दिसणारे दुसरे एटीएम कार्ड सोपविले. हातागळे यांनीही फारसे लक्ष न देता ते कार्ड घेतले आणि निघून गेले.
त्यांनतर या दोन चोरट्यांनी २१ ते २६ सप्टेंबर २०१६ या कालावधीत अंबाजोगाई, परभणी, नांदेड, निर्मल, कामारेड्डी, संगरेड्डी या ठिकाणांवरून हातागळे यांच्या खात्यातून एटीएम कार्डद्वारे तब्बल ४ लाख ३० हजार ८०० रुपयांची रक्कम काढून घेतली. यापैकी काही रकमेतून त्यांनी नांदेड येथे सोने खरेदी केली. २६ सप्टेंबर २०१६ रोजी वसंतराव हातागळे पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये गेले असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी घडल्या प्रकाराबाबत अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, चालू महिन्यात तेलंगणा पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांना अन्य एका गुन्ह्यात अटक केली. चौकशी दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातही अंबाजोगाई सहित विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे कबूल केल्याने त्यांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले. याची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी पोलीस जमादार प्रकाश सोळंके, आवले आणि बनसोडे यांना तातडीने उल्हासनगर येथे पाठवून दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन अंबाजोगाई येथे आणले. दोन्ही चोरट्यांनी एटीएम कार्डद्वारे रक्कम चोरल्याची कबुली दिली असून त्यातून सोने घेतले असल्याचेही सांगितले. त्यांनी अजूनही काही गुन्हे केले आहेत का याची पोलीस चौकशी करत आहेत. बरोबर एक वर्षानंतर या चोरीचा छडा लागल्याने अंबाजोगाई पोलिसांचे नागरिकांनी स्वागत केले.