परळी (जि. बीड) : वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात ‘गुड मॉर्निंग’ म्हटल्याने संतापलेल्या शिक्षकाने ४० विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार येथे २२ सप्टेंबरला घडला. दुसऱ्या दिवशी शिक्षकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान संस्थाचालकाविरुद्ध शिक्षकानेही गुन्हा नाेंदविला. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली.
शहरातील वडसावित्रीनगर भागात मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ संचलित श्री नागनाथ निवासी विद्यालय आहे. या मारहाणीनंतर पालक सुंदर भीमराव पवार (रा.मोगरा तांडा ता.माजलगाव) यांनी २३ रोजी याबाबत शहर ठाण्यात तक्रार दिली. त्याच दिवशी शिक्षक बाळासाहेब फड यांनीही तक्रार दिली. ‘न्यायालयात दाखल केलेली केस काढून घे,’ असे म्हणून संस्थाध्यक्ष भीमराव सातभाई यांनी शिवीगाळ करून दोन चापट्या मारल्या व धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.
संस्था अध्यक्षांचीही तक्रार विद्यार्थी मारहाणीचा प्रकार कळाल्यावर शिक्षक बाळासाहेब फड यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी अरेरावी केली व अंगावर धावून आले, अशी तक्रार मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळाचे अध्यक्ष भीमराव सातभाई यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या शिक्षकास यापूर्वी शाळेतून काढण्यात आले होते, न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा रूजू करून घेतले. विद्यार्थी मारहाण प्रकरणात योग्य ती कारवाई करणार असल्याचे सातभाई यांनी सांगितले.