अंबेजोगाई : सध्या राज्यात लॉकडाऊनमुळे शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली असली, तरी अंबेजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद सिद्रामप्पा पोखरकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप केले. या उपक्रमापोटी त्यांना वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांचा तोटा सहन करावा लागला, तरी सामाजिक दायित्वातून त्यांचा हा उपक्रम अजूनही सुरूच आहे.
अंबेजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी सुरभी नावाने शिवभोजन केंद्र सुरू केले. शासनाकडून प्रारंभीच्या काळात प्रतिथाळी १० रुपये दर आकारण्याचे सांगण्यात आले. पुन्हा या थाळीची किंमत ५ रुपये ठरविली. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर, मागील वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाऊनपासून विनोद पोखरकर यांनी विनाशुल्क थाळी देण्याचा प्रारंभ केला. गेल्या वर्षभरापासून दररोज ते शासनाच्या नियमाप्रमाणे ७५ शिवभोजन थाळ्या उपेक्षितांना विनाशुल्क देत आहेत. या वर्षभरात १ लाख ३६ हजार ८७५ रुपयांपेक्षा जास्तीचा तोटा सहन करूनही पोखरकर यांनी विनाशुल्क थाळी देण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. शिवभोजन थाळीसह पोखरकर यांचा सामाजिक कार्यात व दातृत्वात सातत्याने पुढाकार असतो. आगामी काळातही कोरोनाचा संसर्ग संपत नाही, तोपर्यंत विनाशुल्क शिवभोजन थाळी देण्याचा मानस त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
वर्षभरात दिल्या २७ हजार थाळ्या
अंबेजोगाई येथील सुरभी शिवभोजन कक्षातून वर्षभरात २७ हजारांपेक्षाही जास्त थाळ्या विनाशुल्क देण्यात आल्या आहेत. उपेक्षित नागरिकांना पैसे मागणे माझ्या मनाला पटले नाही. अगोदरच लॉकडाऊन व बेरोजगारीने त्रस्त असलेल्यांना आपण थोडा तरी आधार देऊ शकतो. या भावनेतूनच माझे काम सुरू आहे.
विनोद पोखरकर, अंबेजोगाई.
===Photopath===
170421\5653img-20210416-wa0107_14.jpg