बीड : माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी आपला छोटा मुलगा विरेंद्र यांना बाजार समितीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. विरेंद्र यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. भविष्यात सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, तर सोळंके कुटुंबातील पुढचा वारसदार कोण? विरेंद्र प्रकाश साेळके की जयसिंह धैर्यशिल सोळंके? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सून पल्लवी विरेंद्र सोळंके या देखील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. येणाऱ्या काळात प्रकाश सोळंके हे मुलगा, सुनेला पुढे करतात की पुतण्या जयसिंहला पाठबळ देतात, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांपैकी प्रकाश सोळंके एक आहेत. त्यांनी मंत्रीपदही सांभाळले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाषण करताना ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार बनले. यात त्यांनी मंत्रिपदासाठीही हट्ट धरला होता. अनेक दिवस 'राजीनामा नाट्य' चालले. परंतू त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. अखेर त्यांची 'समजूत' काढल्यानंतर त्यांनी मतदार संघात कामे करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत पुतण्या जयसिंह सोळंके हे देखील सक्रिय आहेत. जयसिंह यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीही बनविले. मतदार संघातील माजलगाव, वडवणी व धारूर तालुक्यात ते सक्रिय आहेत. त्यामुळेच तेच भविष्यात राष्ट्रवादी पुढे नेणार, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतू बाजार समितीच्या माध्यमातून प्रकाश साेळंके यांनी मुलगा विरेंद्र यांना पुढे केल्याने राजकारणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. आता प्रकाश सोळंके यांचा राजकारणाचा वारसा पुढे कोण चालवणार, मुलगा विरेंद्र की पुतण्या जयसिंह? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
...तर काका-पुतण्याची लढाई?जिल्ह्याला काका-पुतण्याची लढाई नवी नाही. यापूर्वी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आ. धनंजय मुंडे, गेवराईत पंडित, बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ. संदीप क्षीरसागर यांच्यात राजकीय लढती झालेल्या आहेत. माजलगावातही जयसिंह सोळंके सध्या सक्रिय आहेत. येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांनाच दावेदार समजले जात आहे. परंतू ऐनवेळी जयसिंह यांना बाजूला करून प्रकाश सोळंके यांनी मुलगा विरेंद्र किंवा सून पल्लवी यांना पुढे केले, तर जयसिंह बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले तर, येथेही काका-पुतण्याची लढाई होऊ शकते. सोबत राहिले तर मतदार संघालाही लाभ होईल, हे देखील तितकेच खरे आहे.
भाजपमध्ये जाण्याचीही चर्चाकाही दिवसांपासून आ. सोळंके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात असेल, तर भाजपच काय शिंदे गटातही जाऊ, असे संकेत दिले होते. जर सोळंके भाजपमध्ये किंवा इतर पक्षात गेले, तर जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी पुढे नेतील, अशी शक्यता आहे. याच मतदार संघातील इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मात्र नाराजी वाढू शकते.
पल्लवी सोळंके सक्रियआ. सोळंके यांची सून पल्लवी विरेंद्र सोळंके या सक्रिय आहेत. गावोगावी त्यांनी बैठकाही घेतल्याची माहिती आहे. परंतू त्यांनी अद्याप एकही निवडणूक लढवली नाही. विरेंद्र सोळंके यांच्यासाठी बाजार समितीची ही पहिली निवडणूक असेल. ते निवडून आले तर सभापती पदासाठी ते दावेदार असतील. मंगला प्रकाश सोळंके यांनाही राजकारणाचा काहीसा अनुभव आहे.