बीड : शहरात स्वच्छता, पाणी आदी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. बुधवारी शहरातील बाबामिया इनामदारनगरातील लोक कॉलनीतील चिखलमय रस्ता तुडवून कुटुंबासह पालिकेत आले. कसल्याच सुविधा नाहीत, अशी त्यांची ओरड होती. आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ते मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या कक्षात गेले. तेव्हा डॉ. गुट्टे हे नेहमीप्रमाणेच गायब होते. त्यामुळे रहिवासी आणखीनच संतापले होते.
बीड पालिकेकडून रस्ते, स्वच्छता, पाणी आदी सुविधांसाठी कराेडोंचा निधी खर्च केला जातो. परंतु, हे सर्व कागदोपत्रीच दाखविले जाते. प्रत्यक्षात लोकांना सुविधाच मिळत नसल्याचे दिसत आहे. शहरातील अपवादात्मक वगळता सर्वच ठिकाणी रस्ते चिखलमय आहेत. तसेच ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. थोडाही पाऊस झाला की, नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो. अशीच समस्या शहरातील बाबामिया इनामदारनगरातील आहे. येथील नगरसेवकांना वारंवार सांगूनही रस्ते झाले नाहीत. तसेच सुविधाही मिळाल्या नाहीत. पालिकेकडेही मागणी केली, परंतु कोणीच लक्ष दिले नाही. अखेर, संतापलेले रहिवासी बुधवारी थेट पालिकेत पोहोचले. आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ते मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या कक्षात गेले. यावेळी ते गायब होते. दुपारी १२ वाजताची वेळ असतानाही आणि सामान्य नागरिक अडचणी घेऊन आलेले असतानाही मुख्याधिकारी नेहमीच गायब राहत असल्याचा आरोप केला जात आहे. अखेर, आवकजावक विभागाला नोंद करून रहिवाशांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
---
सीओ कोठेच उपलब्ध होईनात...
मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे हे कार्यालयात पूर्णवेळ थांबत नाहीत. त्यामुळे ते सामान्यांसाठी उपलब्ध होत नाहीत. तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क केल्यानंतरही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद दिला जात नाही. बुधवारीही याच समस्येला घेऊन त्यांच्याशी संपर्क केला. परंतु, त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.
220921\22_2_bed_7_22092021_14.jpeg~220921\22_2_bed_6_22092021_14.jpeg
समस्या घेऊन पालिकेत निघालेल्या बाबामिया इनामदार नगरातील लोकांना अशाप्रकारे चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढावा लागला.~पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर जमलेले नागरिक दिसत आहेत.