बीड : आगामी नगर पालिका निवडणूकांमध्ये घरचा उमेदवार देणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. याला काकाने नव्हे तर त्यांचेच चुलत भाऊ डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. आता घरात उरलेच कोण? उमेदवारच नाही तर उमेदवारी देणार कोणाला? असा टोला डॉ.क्षीरसागर यांनी आ.क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या प्रचारात पालिकेचे राजकारण सुरू झाल्याचे यावरून दिसत आहे.
जिल्ह्यात सध्या १० पैकी ९ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका होत आहेत. बीड कृउबासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात देण्यासाठी पुतण्या आ.संदीप क्षीरसागर यांनी कंबर कसली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघर्ष समिती आदी पक्ष आ.क्षीरसागर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बीडच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अगदी विधानसभा निवडणूकीला जसा प्रचार केला जातो, तशीच अवस्था सध्या बीडमध्ये पहावयास मिळत आहे.
सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते गावोगावी जावून बैठका, प्रचार सभा घेत असल्याचे दिसत आहे. अशीच एक बैठक कामखेड पंचायत समिती गणाच्या पारगाव येथे घेण्यात आली. यावेळी आ.क्षीरसागर यांनी आगामी पालिका निवडणूकीत घरचा उमेदवार देणार नाही. लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सामान्य घरातील शेतकऱ्याचे पोर खुर्चीवर बसविणार असा दावा केला होता. यालाच माजी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिले आहे. बीड शहरातील एमआयडीसी भागात रविवारी व्यापारी हमाल-मापाडी मतदारांचा मेळावा आयोजित केला होता. तुमच्या घरात आला उरलेच कोण? उमेदवारच नाही तर उमेदवारी देणार कोणाला? असा टोला त्यांनी आ.क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला आहे. यामुळे आता काका-पुतण्यानंतर भावा-भावांत राजकीय वाद सुरू झाला आहे.
हेमंत क्षीरसागर आहेत तरी कोठे?आ.संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे मागील काळात पालिकेत उप नगराध्यक्ष राहिले आहेत. प्रत्येक कार्यक्रमात ते आ.क्षीरसागर यांच्या सोबत असायचे. परंतू मागील काही महिन्यांपासून ते कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाहीत. ते नेमके आहेत तरी कोठे? असा सवाल उपस्थित होत आहे. आ.क्षीरसागर यांच्या वक्तव्यामुळे हेमंत व अर्जून क्षीरसागर यांना उमेदवारी मिळण्याच्या आशा संपुष्यात आल्या आहेत. हेमंत यांनी पालिकेत स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविले. गल्ली बोळात जावून स्वच्छतेचा आढावा घेतला होता. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचकही होता. हेमंत हे कधी समेार आले नाहीत, परंतू विधानसभा निवडणूकीत त्यांनी पडद्या मागचा कलाकार म्हणून भूमिका पार पाडली होती.