अंबाजोगाई : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१६) सकाळी अंबाजोगाईत सकल मराठा समाजाच्या वतीने येथील दोन्ही आमदारांच्या निवासस्थानावर क्रांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन दोन्ही आमदारांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाचा मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून त्याविरोधात प्रचंड क्षोभ आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अंबाजोगाईत सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुकवारी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सर्वप्रथम आ. संजय दौंड यांच्या घरावर धडकला. आ. दौंड यांना निवेदन दिल्यानंतर बसस्थानक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे आ. नमिता मुंदडा यांच्या निवास्थानी दाखल होत मोर्चेकऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळातही मराठा समाजातील हजारो बांधवांनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभाग नोंदविला. विशेषतः महिलांच्या संख्या लक्षणीय होती. ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे अशा वेशातील आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेसह आरक्षण मागणीच्या घोषणांनी शहर दणाणून सोडले. या मोर्चाने तीन वर्षापूर्वी राज्यभरात निघालेल्या लाखोंच्या संख्येच्या मराठा मोर्चाच्या आठवणी ताज्या झाल्या.
तगडा पोलीस बंदोबस्तमोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. एक सहा.पोलीस निरिक्षक, ९ पोलीस निरिक्षक आणि ६५ पोलीस कर्मचाऱ्यांसह स्वतः पीआय सिद्धार्थ गाडे हे पूर्णवेळ बंदोबस्तावर हजर होते. तर, पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी सुनील जायभाये हे सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कुठल्याही अनुचित घटनेविना मोर्चा शांततेत पार पडला. या आहेत मागण्या :दोन्ही आमदारांना मोर्चात सामील लहान मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, त्यासाठी स्वतंत्र गट करून ओबीसीचे टक्केवारी वाढवावी, स्थगिती उठेपर्यंत शासकीय नोकरभरती करू नये, स्थगिती उठविण्यासाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत, २०१४ च्या मेगा नोकर भरतीत आरक्षण कोट्यातून पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, ‘एमपीएससी’च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, स्थगितीपूर्वी सुरु असलेली शैक्षणिक प्रक्रिया पूर्वलक्षी प्रभावाने चालू ठेवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करून कर्जप्रक्रिया सुलभ करावी, सारथी संस्थेला तत्काळ निधी देऊन सारथी संस्था बळकट करावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चांनी इतिहास घडवत आरक्षण मिळविले. परंतु, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची देखील आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी आगामी अधिवेशनात लावून धरणार.- आ. संजय दौंड, विधान परिषद सदस्य
माझ्यासह भाजप पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा केवळ मुद्दा मांडून शांत बसणार नाही तर त्याचा आम्ही सर्वजण पाठपुरावा करू. या मुद्द्यावर मी मराठा आंदोलकांसोबत असून वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरण्यास देखील तयार आहे.- आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा सदस्य