बीड : कोरोना समूह संसर्गाचा वेग कायम असून, मंगळवारी १६ जणांचा जीव गेल्यानंतर बुधवारी पुन्हा पाचजणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. नवीन १०४७ रुग्ण आढळून आले, तर ९०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी चार हजार ५७६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तीन हजार ५२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर एक हजार ४७ नवे रुग्ण आढळून आले. बीडमध्ये सर्वाधिक २२३ नवे रुग्ण आढळून आले, तर अंबाजोगाईत १७६, आष्टीत १२४, धारूरमध्ये ४३, गेवराईत १०१, केजमध्ये १२५, माजलगाव ४८, परळीत ९०, पाटोदा ५१, शिरुरमध्ये ३५, वडवणी येथे ३१ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ९०४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४२ हजार ५०५ इतकी झाली असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३६ हजार ५३७ इतकी असल्याची माहिती जि. प. सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
सत्र थांबेना; मृत्यूसंख्या ७७१
बुधवारी पाच बळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. खतगव्हाण (ता. माजलगाव) येथील ३७ वर्षीय पुरुष, वडवणी येथील ७५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील ८६ वर्षीय महिला, आष्टीतील ६५ वर्षीय पुरुष व आडस (ता. केज) येथील ७० वर्षीय महिला यांचा मृतांत समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बळींचा आकडा ७७१ इतका झाला आहे.