--------
नियमांचा अडसर
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विवाह सोहळ्यांवर अनेक बंधने आली आहेत. २५ लोकांच्या मर्यादेत विवाह सोहळा करताना कोरोना चाचणी व निगेटिव्ह अहवालाचे बंधन आहे, तसेच पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे. मास्क आणि सामाजिक अंतराचे बंधन आहे. लॉकडाऊन व आंतरजिल्हा, तसेच आंतरराज्य प्रवासासाठी प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे. नियमांच्या भडिमारामुळे व कारवाईच्या भीतीमुळे झंझट नको म्हणून अनेकांनी विवाह करण्याचे टाळले आहे.
----------
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
१) बंधनांमुळे अनेक कुटुंब नियमांचे पालन करीत विवाहसोहळा घरातच मोकळ्या जागेत करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय, मंडप, घोडे, वाजंत्री, फुलहार, आचारी, केटरिंग टाळले जात असल्याने या व्यवसायांना फटका बसला आहे.
२) दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने मंगल कार्यालये ओस पडली आहेत. मात्र, त्याची देखभाल व त्यासाठी लागणारा खर्च पदरमोड करावा लागत आहे.
३) लग्नसोहळ्यांवर समाजातील विविध व्यवसाय, तसेच रोजगार अवलंबून आहेत. मात्र, या सर्वांचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात २५० खासगी व सार्वजनिक मंगल कार्यालये आहेत.
४) अनेक कुटुंबांनी नियोजन अनामत रक्कम भरून तारखा आरक्षित केल्या. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने आरक्षण केलेल्यांना त्यांची अनामत रक्कम परत देण्याची वेळ मंगल कार्यालयांच्या चालक, मालकांवर आली.
-------
माझ्या मुलीचा विवाह सोहळा २६ मे रोजी नियोजित होता. त्यादृष्टीने सर्व नियोजन केले होते; परंतु राज्यात कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे शासनाने लॉकडाऊन जारी केला. प्रशासनाचे नियम, २५ लोकांनाच परवानगी व इतर बंधनांमुळे लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलावा लागला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच आयोजनाचा विचार आहे.
-श्रीकिसन आसाराम भक्कड, वधूपिता, बीड.
--------------
माझ्या मुलाचा विवाह १३ मे रोजी निश्चित केला होता. त्यानुसार नियोजन केले होते. व्याही मंडळी कर्नाटकमधून बीड येथे येणार होती; परंतु लॉकडाऊनमुळे आंतरराज्य परवानगी, तसेच तीन जिल्हे ओलांडून यावे लागणार असल्याने पास, तसेच इतर अडचणी होत्या. त्यामुळे तूर्त लग्न पुढे ढकलले. मंगल कार्यालय मालकाने भरलेली अनामत परत दिली.
-अमोल भांडेकर, वरपिता, बीड.