आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रांमधील प्रेमभाव, आदर आपल्या लेखनातून होणारी देवाण-घेवाण मोबाईल आणि संगणकाच्या फलकावर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकीच संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत.
आज काळ बदलला आहे. पूर्वी प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा. आता मात्र तो दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रे गोळा करून पुढे पाठवत असे. आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले नाही तिथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्र प्रपंच काहीसा दुरावला आहे. आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचे उपयोग व्हायचा. यातही अनेक बदल झाले आहेत.