- नितीन कांबळेकडा ( बीड): वय ३२ वर्ष, रंग काळा, बांधा मजबूत, उंची साडेपाच फुट, दोन पत्नी, पाच मुलं, व्यवसाय- चोरी, घरफोडी यातूनच १०० च्या वर गुन्हे दाखल असलेल्या या कुख्यात दरोडेखोराचे नाव आहे आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले. राज्यभर धुमाकळ घातलेला आटल्या नुकताच पोलिसांनी जेरबंद केला. अवघ्या ३२ वर्षांत गुन्ह्यांचे शतक करणारा हा आटल्या कोण आहे याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील ईश्वर भोसले याचा गुन्हेगारी क्षेत्रात मोठा दबदबा होता. त्याला ४ बायका १९ मुले, ८ मुली असे ३१ लोकांचे कुटुंब होते. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तो चोरी, घरफोडी, दरोडे टाकायचा. त्याच्यावर अनेक गुन्हे त्यावर दाखल होते. आटल्या उर्फ अतुल हा ईश्वर भोसलेचा मुलगा. आटल्या हा लहान असल्यापासून वडिलाच्या सोबतीने गुन्हे करायचा. ईश्वर भोसलेचा आजारपणात मृत्यू अन त्याच्या मुलांनी टोळीकरून संघटितपणे घरफोडी करू लागली.
दरम्यान, या टोळीचा मास्टर माइंड ठरला आटल्या. आटल्या आणि त्याच्या भावंडाच्या टोळीने सोलापुर, सातारा, उस्मानाबाद, बीड, पुणे, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद जिल्ह्यांसह राज्यभर धुमाकूळ घातला. चोरी, घरफोडी, बलात्कार, जबरी चोरी, खुनासह दरोडा यासह विविध गुन्हे दाखल आहेत. तब्बल शंभरच्यावर गुन्हे आटल्यावर दाखल आहेत. साठ गुन्ह्यात तो फरार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर होता. सोबत पिस्टल आणि धारदारशस्त्र तो कायम जवळ बाळगत असे. पोलिसांनी आटल्याच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत.
आष्टी पोलिसांची धाडसी कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून आटल्या पोलिसांना हवा होता. राज्यभरातील पोलिस त्याच्या मागावर होते. पण संघटित गून्हेगारी करत असल्याने व पोलिसावर हल्ले चढवत असल्याने तो पसार होण्यात यशस्वी होत असताना आष्टीच्या जिगरबाज पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. या धाडसी कारवाईमुळे आष्टी पोलिसांचे कौतुक होत आहे.