बीड : अंधश्रद्धेचा बळी ठरत पती, सासरा, दिरासह सात जणांनी एका २७ वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मासिक पाळीचे रक्त घेतले. तसेच तीन दिवस तिला उपाशीपाेटी ठेवून छळ केला. ही संतापजनक घटना बीड तालुक्यात उघडकीस आली. पीडित विवाहितेने माहेरी गेल्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. ऐन महिलादिनी दाखल झालेल्या या गुन्ह्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील एका २७ वर्षीय महिलेचा विवाह २०१९ साली झाला होता. तिचे लग्न घाटकोपर येथे ठरले होते. त्यामुळे तिला गुरू आई असलेल्या महिलेने गडंगन खायला बोलावले होते. याच जेवणात गुंगीचे औषध टाकले. त्याच रात्री तिच्याशेजारी सध्याचा पती असलेल्या मुलाला झोपवले. त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि घाटकोपरच्या नियोजित वराला पाठविला. या प्रकरणात पीडिता तक्रार देण्यासाठी गेली; परंतु गुरू आईने माफी मागत हे प्रकरण मिटवले, तसेच ज्याच्यासोबत व्हिडीओ बनवला, त्याच्यासोबत लग्न लावून दिले; परंतु त्याचे आगोदरच एक लग्न झाल्याचे पीडितेला सासरी आल्यावर समजले. तिने याबाबत विचारणा केल्यावर तिला धमकावण्यात आले.
पीडितेने कौटुंबिक न्यायालयात प्रकरणही दाखल केले. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर हेच नातेवाईक तिच्या पाया पडले. माफी मागत हे प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये पीडिता सासरी आली; परंतु सासू, सासरा यांच्याकडून तुझा नवरा काहीच कमावत नाही, त्यामुळे तुला खायला देणार नाही, असे म्हणत तिला त्रास देऊ लागले. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२ च्या दरम्यान दीराने मासिक पाळी सुरू असताना रक्त दे, असे म्हणत मारहाण केली. पीडितेने नकार दिल्याची माहिती इतरांना दिली. त्यानंतर पीडितेला सर्वांनीच एका खोलीत बांधून ठेवत अघोरी कृत्य केले. तिला तीन दिवस उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. हा अन्याय असह्य झाल्याने पीडितेने माहेर गाठले. तेथे आईच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पती, सासरा, सासू, दिरासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता हाच गुन्हा झीरोने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पतीसमोर व्यथा; पण सहकार्य नाहीविवस्त्र केल्याचा, रक्त घेतल्याचा, मारहाणीसह छळ केल्याचा संतापजनक प्रकार पीडितेने पतीलाही सांगितला; परंतु पत्नी अनेक मिळतील, माय-बाप मिळणार नाहीत, असे म्हणत त्यानेही याकडे दुर्लक्ष केले. तसेच तू पण याचे काही मनावर घेऊ नकोस, असे म्हणत पीडितेला सहकार्य केले नाही. त्यामुळेच संतापलेल्या पीडितेने माहेर गाठून पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.