लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या विविध कामांच्या जवळपास ३५ कोटी रुपयांची प्रलंबित देयके निकाली काढावी या मागण्यांसाठी जिल्ह्यातील गुत्तेदारांनी शुक्रवारी येथील कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला निवेदन डकवून हार घालून गांधीगिरी आंदोलन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड व अंबाजोगाई उपविभागांतर्गत जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डे भरणे तसेच शासकीय कार्यालये, निवास्थानांची दुरुती आदी ३०५४, २२१६, २०५९ या हेडखाली करण्यात आली आहेत. केलेल्या कामांचे क्रॉस चेकिंग करून दायित्वदेखील मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु, मागील सात ते आठ वर्षांपासून या कामाची बहुतांश देयके प्रलंबित आहेत. शासकानकडून ही देयके अदा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे बीड येथे आले असता त्यांनी या कामांच्या देय असलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम लवकरच अदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यासही चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
केलेल्या कामांची शासनाकडून देयके मिळत नसल्याने गुत्तेदार मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी गुत्तेदारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सर्व गुत्तेदार प्रलंबित देयकांसाठी एकत्र जमले. मात्र तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून निवेदन डकविले.या वेळी शिवलाल मुळूक, आर. डी. कुलकर्णी, बाबासाहेब आठवले, भागवत काळे, प्रल्हाद झिरपे, शिवाजी मोटे, राजेंद्र भांडवे, मनोज पाठक, सतीश दांगट, बबन गवते, बापू गाडेकर, मुरलीधर राऊत, अंकुशराव शेलार, राजाभाऊ घोडके, राजेंद्र भोंडवे, सुभाष सपकाळ, मुझफ्फर पठाण, आसाराम माने, जगदीश शेळके यांच्यासह ५० ते ६० गुत्तेदारांनी सहभाग नोंदविला.
मंत्र्यांच्या नावाने बोंबशुक्रवारी दुपारी ५०-६० गुत्तेदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एकत्र आल्यानंतर निवेदन घेण्यास एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे कार्यकारी अभियंता क्र. १ पी. जी. नाईकवाडे व क्र. २ चे कार्यकारी अभियंता एन. डी. शिंदे यांच्या खुर्चीला निवेदन डकवून हार घालून गांधीगिरी आंदोलन केले. त्यानंतर बांधकाम मंत्री व कार्यकारी अभियंत्याच्या नावाने बोंब ठोकली