बीड : हैदराबादच्या निजामाच्या जुलमी व अन्यायी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलनेही महत्त्वाची होती, असे प्रतिपादन शिक्षक नेते उत्तम पवार यांनी केले.
शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ५६५ पैकी ५६२ संस्थाने भारतात सामील झाली. परंतु हैदराबाद, काश्मीर, जुनागड ही संस्थाने भारतात सामील झाली नाहीत. त्यावेळी मराठवाडा हा प्रांत हैदराबाद संस्थानचा एक भाग होता. हैदराबादच्या निजामाची राजवट अन्यायी होती. ती उलथवून टाकण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या लढ्याचे प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ हे होते. यामध्ये विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. काही ठिकाणी सशस्त्र आंदोलन झाल्याचे ते म्हणाले. यावेळी शाळेचे प्रशासन अधिकारी डॉ. नंदकुमार उघाडे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पवार, मुख्याध्यापक अंकुश गोरे, ज्ञानेश्वर ढोरमारे, उज्ज्वला लाखोळे, वर्षा डोळस, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.