बीड : कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील एका कृषी केंद्र चालकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई १ जून रोजी करण्यात आली. या दुकानात आढळून आलेल्या कापूस बियाणांचा स्रोत आढळून आला नसल्याने २१ लाखांचे बियाणे विक्री बंदचा आदेशही त्या दुकान चालकास बजावला आहे.
सार्थक ॲग्रो अँड ट्रेडर्स असे कारवाई करण्यात आलेल्या कृषी केंद्राचे नाव आहे. खरीप हंगाम सुरू होत असल्याने बाजारात शेतकरी बियाणे व खते घेण्यासाठी गर्दी करत आहेत. याचा फायदा उचलत काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करत असल्याचे समोर आले. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. गेवराईचे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांना एका दुकानामध्ये जादा दराने बियाणांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पंचनामा करून बनावट ग्राहक तयार केला. त्याच्याकडे १७५० रुपयांच्या विविध चलनी नोटा देऊन अधिक दराने बियाणे विक्री होत आहे का याची पडताळणी करण्यासाठी शिरसदेवी येथील सार्थक ॲग्रो अँड ट्रेडर्स येथे त्या बनावट ग्राहकास पाठविण्यात आले.
त्यावेळी दुकानदार रमेश प्रभाकर डरपे यांनी त्या बनावट ग्राहकास ८६४ रुपयांची कबड्डी कापूस बियाणांची बॅग १३०० रुपयांना विक्री केली परंतु पावती मात्र ८६४ रुपयांची दिली. त्यानंतर तातडीने तालुका कृषी अधिकारी व पथकाने पंचासमक्ष चिन्हांकित केलेल्या नोटांची पडताळणी केली. या कारवाईनंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही तक्रारी केल्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुकानाची तपासणी केली असता दुकानदाराकडे खरेदी बिल तसेच बियाणांचा स्रोत आढळून आला नाही. त्यामुळे अंदाजे २१ लाख रुपये किमतीचे बियाणे विक्री बंदचा आदेश गेवराईचे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी दिला. या कारवाईत कृषी सहायक भगवान मोहळकर यांचे सहकार्य लाभले. संबंधितांच्या परवान्यावर जिल्हा गुणवंत निरीक्षक कल्याण अंभोरे यांच्या वतीने कारवाई प्रस्तावित होणार आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कृषी केंद्र चालकांनी कोणत्याही बियाणांची चढ्या भावाने विक्री करू नये. तसेच स्वत: जवळ बियाणे उपलब्धतेचा स्रोत सोबत ठेवावा. विक्रेत्यांनी अधिकृत परवानाधारक नसलेल्या किरकोळ विक्रेत्या व्यक्तीस बियाणे विक्री करू नये. चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी
-बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड