परळी : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शहरातून निघालेल्या भाजपच्या मदतफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर नागरिक वस्तू आणि निधीच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र या वेळी पाहायला मिळाले.
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदतफेरीला सुरुवात झाली. बसस्थानक रोड, एकमिनार चौक, स्टेशन रोड, टाॅवर, गणेशपार आदी प्रमुख मार्गांवरून ही मदतफेरी काढण्यात आली. राज्यातील विविध भागांत पुरामुळे झालेले नागरिकांचे प्रचंड नुकसान लक्षात घेता पंकजा मुंडेंनी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता.
पंकजा मुंडे या मदतफेरीत स्वतः सहभागी झाल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ काॅलेजचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. फेरी निघाल्यानंतर काही वेळातच मोठी रक्कम जमा झाली. तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.
290721\img-20210729-wa0396_14.jpg