बीड : मागास भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, हा संस्थेचा हेतू आहे, असे प्रतिपादन प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव सुभाषचंद्र सारडा यांनी केले. राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय, बीडच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष सिराजोद्दीन देशमुख यांनीही संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे उद्घाटक, संस्थेचे अध्यक्ष सिराजोद्दीन देशमुख यांचे स्वागत राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ चौधरी, माध्यमिक विद्यालय, रुईचे मुख्याध्यापक एस. जी. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांचे स्वागत नॅशनल उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सिद्दीकी नवीद व नॅशनल उर्दू प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक इनामदार यांनी केले. याप्रसंगी आदित्य एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांचे स्वागत राष्ट्रीय प्रा. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना तोष्णीवाल व पेंडगाव येथील सफदर अली देशमुख राष्ट्रीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री उणवणे व उर्दू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इशरत बेगम यांनी केले..
संस्थेचे कोषाध्यक्ष ओमप्रकाश जाजू यांनी या शाळेची इमारत पूर्ण झाल्याबद्दल आज सोनियाचा दिवस उजाडल्याचे सांगितले. संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आहेत असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांनी संस्थेच्या या शाळेची इमारत पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळा सुरू केल्या व पस्तीस वर्षांत या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. मागास भागातील तळागाळातील लोकांना शिक्षण मिळावे, हा संस्थेचा मुख्य हेतू होता. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक झाल्याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार काढले.
कार्यक्रमाचे उद्घाटक सिराजोद्दीन देशमुख यांनी अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांनी मिळून संस्थेचा विकास केल्याचे सांगितले. संस्थेच्या सर्व शाळांच्या इमारती उभ्या राहिल्याचे समाधान व्यक्त केले. मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांची प्रगती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.