आष्टी : राज्य लोकसवा आयोगाच्या वतीने २०१७मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत तालुक्यातील आंधळेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील आजिनाथ आश्रुबा आंधळे यांनी यश प्राप्त केले. गावातून पहिला फौजदार होण्याचा मान त्यांनी मिळविला.
राज्य लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेचा १० फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. आजिनाथ आंधळे यांची पीएसआयपदी निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले व घरची परिस्थिती बेताची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर आजिनाथ यांनी हे यश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्म गावीच झाले. माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, आष्टा येथे, तर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आष्टी येथे झाले. २००७ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर राज्य राखीव पोलीस बल, औरंगाबाद येथे भरती झाल्यानंतर २०१७ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. याबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.