बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्यात कोव्हीड आणि खरीप हंगामाबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी आले आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरु असताना कंत्राटी नर्स आणि मराठा आरक्षण आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी बाहेर आंदोलन केले.
पोलिसांनी यावेळी १०० पेक्षा कंत्राटी नर्सना डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात स्थानबद्ध केले. दरम्यान, अजित पवार हे बैठक आटोपून जात असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावावर लाठीचार्ज झाला. तर घोषणाबाजी करणाऱ्या एका मराठा आंदोलकास ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १८ जून रोजी बीडमध्ये सकाळी जिल्ह्यस्तरीय कोविड व खरीप हंगाम आढावा बैठक सुरु होती. यावेळी कंत्राटी नर्स यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. 100 पेक्षा जास्त जणींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरात स्थानबद्ध करण्यात आले होते. निवेदन देण्यासाठी आलेल्या काही परिचारिकांना लाठीचा प्रसाद मिळाला. यामुळे परिचारिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची मागणी करत या कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.