"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:23 IST2025-04-02T13:06:38+5:302025-04-02T13:23:59+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केलेल्या विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका
Ajit Pawar: राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीककर्जाचे पैसे भरा, असं विधान केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्या या विधानावरुन टीका केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. घोषणांबाबत माझ्या भाषणात सांगितले नव्हते असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांवर भाष्य केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन टीका होत असताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा विचार करु असंही अजित पवार म्हणाले.
"काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. आपण लाडकी बहीण योजना चालू केली. त्यामध्ये आपण सध्या १५०० रुपये देतो. पण ज्यावेळी आपली परिस्थिती काळानुरुप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण करु. मी ३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितले. तर त्याच्यावरुन टीका केली. जाहीरनाम्यामध्ये जरुर सांगितले होते पण माझ्या एकाही भाषणात मी सांगितले नव्हते. माझी भाषणं काढून बघा. कारण मी त्याचा उल्लेख केला की सगळी सोंग करता येतात पैशाचे सोंग करता येत नाही. विरोधक म्हणतात तुम्हाला घोषणा करताना आठवलं नाही का. अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे. ते नियोजन बिघडता कामा नये," असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
"लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे ४५ हजार कोटींचा बोजा सरकारने पेलला असताना कर्जमाफीसारखी सध्या तरी आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा. काहींनी निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. जे सांगितले, ते प्रत्यक्षात येत नाही. शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे, की ३१ तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा," असं आवाहन अजित पवारांनी केले होते.