Ajit Pawar: 'मराठवाडा माझी सासरवाडी म्हणून...', अखेर अजित पवारांनी तोंडावरचा मास्क काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:43 PM2022-04-08T14:43:45+5:302022-04-08T15:23:05+5:30
Ajit Pawar: नेहमी मास्क वापरणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मास्क काढून भाषण करताना पाहायला मिळाले.
बीड: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची बोलण्याची स्टाईल असो किंवा आपल्या भाषणातून केलेली टोलेबाजी, अजित पवारांची नेहमीच चर्चा होत असते. यातच आज अजित पवारांनी मास्क काढून केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत, तिथे एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी मास्क काढल्याचे पाहायला मिळाले.
आग्रहाचा मान ठेवून मास्क काढला
बीडमधील कार्यक्रमात भाषण देत असताना उपस्थितांनी मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह केला. यावेळी अजित पवारांनी मराठवाडा आपली सासरवाडी असल्याने मास्क काढावाच लागेल, अशी मिश्कील टिपण्णी केली. यानंतर अजित पवारांनी संपूर्ण भाषण मास्कशिवाय केले. अजित पवारांच्या टिपण्णीवर कार्यक्रमात एकच हशा पिकला. दरम्यान, नेहमी मास्कमध्ये असलेले अजित पवार विना मास्क भाषण करताना पाहून सर्वजण चकीत झालेले पाहयला मिळाले.
सरकारने सर्व नियम मागे घेतले
राज्य सरकारने 31 मार्चपासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्र मास्कमुक्त झाला आहे. परंतू, अजित पवार आजही मास्क वापरताना दिसतात. कुठल्याही कार्यक्रमात ते मास्कचा नियम मोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मास्क ऐच्छिक केला असला तरी पण आपण काळजी घेऊन मास्क घातला पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले होते.