बीड- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली होती. आता या सभेला प्रत्युत्तर म्हणून आज उपमुख्यमंत्री अजित पवार सभा घेणार आहेत. या सभेची बीडमध्ये जोरदार तयारी केली आहे. या सभेचा टीझरही लाँच केला असून या टीझरमध्ये खासदार शरद पवार यांचा फोटोही वापरण्यात आलेला नाही.
बीड शहरात सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआउट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत. सभेला लोकांसाठी अनेक ठिकाणांहून परिवहन महामंडळाच्या बसही लावल्या आहेत.
या सभेच्या अगोदर अजित पवार गटातील नेते खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तटकरे म्हणाले, बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात उद्याच्या बीडच्या सभेने होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२ जुलैला अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेत्यांनी एकत्रित बसून सामुदायिक निर्णयातून एनडीएमध्ये आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात आमच्या नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ५ जुलैला एमएटीच्या मेळाव्यात आम्ही घेतलेल्या भूमिकेची पार्श्वभूमी राज्याला अजितदादा पवार यांनी सांगितली. आमची धर्मनिरपेक्षता ही मूळविचारधारा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. त्या विचारांवर ठाम विश्वास ठेवत आणि ती विचारधारा पुढे नेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र व राज्याची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राला अधिक गतीमान पध्दतीने विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर देशामध्ये नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आणि राज्यातील महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. हा निर्णय घेत असताना घटनात्मक कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करत हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करतानाच जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयाची सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील आमचे सर्व मंत्री भूमिका बजावत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.