परळी : तालुक्यातील दारावती तांडा येथे परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अवैध गावठी दारुविरुद्ध धडक मोहीम सुरू करून ३२ हजार रुपयांची दारू व रसायन नष्ट केले. परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे बुधवारी सकाळी अचानक जाऊन तेथे चालू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात ३२ हजार रुपये किमतीची दारू व रसायन नष्ट करण्यात आले. परळी ग्रामीण पोलिसांची गाडी पाहताच दारू विक्रेते तेथून पळून गेले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम बोडके, केकान, मंगले, स्वामी, घुगे, डोरलीकर यांनी केली.
===Photopath===
290421\29bed_1_29042021_14.jpg