विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा द्याव्यात
बीड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या परीक्षा ३ मे पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहेत. के.एस.के महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊन नियोजित वेळेनुसार परीक्षा द्याव्यात तसेच काही समस्या असल्यास संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले आहे.
स्वच्छता मोहीम राबवा
अंबाजोगाई : शहरातील अनेक भागांमध्ये उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. काही ठिकाणी दोन ते तीन दिवस घंटागाडीचा पत्ता नसतो. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याचे ढिगारे उचलावेत तसेच घंटागाडी वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
उघड्या रोहित्रांमुळे धोका वाढू लागला
पाटोदा : शहर आणि परिसरात असलेल्या अनेक रोहित्रांना दरवाजेच नाहीत. जेथे आहेत ती नेहमी उघडीच असतात. दरवाजे लावण्याकडे महावितरणचे कर्मचारी देखील डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सूचना देण्याची मागणी होत आहे.