माजलगाव (बीड) : शहरातून जात असलेला पंढरपूर - खामगाव महामार्ग हा शंभर फुटाऐवजी 70 फुटाचा करण्यात येत आहे. या रस्ता नियोजनानुसार 100 फूटाचाच करण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता शिवाजी चौक येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंढरपुर - खामगाव हा शहरातून जात असलेला महामार्ग सुरुवातीला 100 फुटाचा होता. मात्र हा मार्ग अचानक 70 फुटाचा करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा महामार्ग शहरातून जात असल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे त्याचप्रमाणे भविष्यात शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार 100 फुटाचा रस्ता उपयोगाचा ठरले. त्यामुळे गेल्या पाच -सहा दिवसापासून शंभर फुट रस्त्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या मार्फत लोकभावना शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय संघटना नागरिकांकडून करण्यात आलेला आहे.
परंतु; संबंधित कंपनी व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतीत टोलवाटोलवी केल्या जात असून 70 फुटाचाच रस्ता करण्याचा घाट घातल्या जात आहे. यामुळे आज सकाळी शिवाजी चौक येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आमदार आर. टी. देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, रस्त्याची रुंदी कमी होणे हा त्यांच्या अकार्यक्षमतेचा परिणाम असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला. यानंतर मागणीचे निवेदन नायब तहसीलदार रामदासी यांना देण्यात आले. जवळपास एक तास चालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली.
आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळुंके, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उप संचालक मोहन जगताप, राजेंद्र होके, शेख मंजूर, सचिन डोंगरे ,शरद यादव , मनोज फरके , रोहन गाडगे, भागवत भोसले, राहुल लंगडे,काळू पटेल आदींसह सर्वपक्षीय युवक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.