लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली.बसपा कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते बीड येथे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
या वेळी प्रदेश प्रभारी डॉ. ना. तु. खंदारे, जिल्हाध्यक्ष आनंद गायकवाड उपस्थित होते. साखरे म्हणाले, भाजपच्या राज्यात सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वैतागला आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे ते म्हणाले.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खानदेश असे स्वतंत्र राज्य करण्याची जनतेची मागणी आहे. विदर्भ, मराठवाडा विकासाच्या बाबतीत अत्यंत पिछाडीवर आहे. याला भाजप व कॉँग्रेसचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी या राज्यांच्या निर्मितीसाठी बसपाचे समर्थन असल्याचे साखरे म्हणाले. राज्यात जिल्हानिहाय बैठकीतून समीक्षा केली जात असून बहुजन व आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ना. तु. खंदारे म्हणाले, सरकारने शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली ती अद्याप पूर्ण झालेली नाही. कर्जमाफीसाठी मागासवर्गियांचा विकास निधी सरकारने वापरला. त्यामुळे आर्थिक व सामाजिक विकास खुंटल्याचे ते म्हणाले. हा निधी परत करावा, बारा बलुतेदारांचे कर्ज माफ करावे, टेंभुर्णी येथील युवतीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी माणी बसपाच्या वतीने खंदारे यांनी केली.