बीड : जिल्ह्याचे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्याचे निर्बंध लागू होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले. त्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. या आदेशानंतर व्यापारी वर्गाला धक्का बसला. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केलेले हे आदेश आता ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.
हे सुरू राहणार
रुग्णालय, रोगनिदान केंद्र, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषध निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवाए किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई , खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालाची, वस्तूंची वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, इ- काॅमर्स, मान्यताप्राप्त वृत्तपत्रे आणि त्याच्याशी संबंधित सेवा, स्थानिक आपत्ती प्राधिकरणाने निश्चत केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने सामाजिक अंतर ठेवून, दुकानासमोर चिन्हांकित चौकट ओढून, ग्राहकांना प्रतीक्षा कक्षात बसवून सुरू ठेवता येणार आहेत.
काय बंद राहणार ?
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स, पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. सर्व केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.
बंद दुकानवाल्यांनी काय करायचे?
या आदेशाने बंद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे भारत सरकारकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. अत्यावश्यक सेवांच्या दुकानांमध्ये ग्राहक संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपायांचे (पारदर्शक काचेमधून अथवा सदर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेमेंट इत्यादीची पूर्वतयारी करावी. त्यानंतर ही दुकाने सुरू करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.
रिक्षा, टॅक्सीत ५० टक्के तर बस पूर्ण क्षमतेने
या आदेशानुसार ऑटो रिक्षा चालक व २ प्रवासी तर चारचाकी वाहनात चालकव ५० टक्के प्रवासी क्षमतेला अनुमती आहे. तर बसमध्ये आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी आसनावर बसण्यास अनुमती आहे, परंतु उभे राहून प्रवासाला प्रतिबंध आहे.
---------
रस्त्यावरील खाद्यपदार्थ फक्त पार्सल व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दिवशी सुरू ठेवाव्यात, आदेशाचा भंग केल्यास साथरोग संपेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
-----------